Tuesday, 14 March 2017

पैसा झाला खोटा..

नोटाबंदीनंतर आपण Cashless तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहोत, विकसित देशांमध्ये Cashless तंत्रज्ञान आल्यानंतर त्यांना सुरुवातीला कशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला आणी Cashless तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनशैलीवर कशा बऱ्या-वाईट पद्धतीने फरक पडत आहे आणी त्याचे पुढील पिढीवर  कसे परिणाम होणार आहेत  व त्याच्याविषयी कोणत्या उपाययोजना करता येतील ह्याचा वेध घेणारा लेख डिसेंबर २०१६ साली लिहिला असून मार्च  २०१७ रोजी प्रकाशित करत आहे.

गेल्या महिन्यात माननीय पंतप्रधांनांनी ५०० आणी १००० रुपये किमतीच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या घोषणेनंतर वेगवेगळ्या पातळींवर त्याचे स्वागत झाले काही ठिकाणी टीकाही झाली परंतु नोटाबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता भारतीय अर्थव्यवस्था ही किती मोठ्या प्रमाणात रोखीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आहे ही गोष्ट स्पष्ट झाली. कमी रोकड उपलब्ध असल्यामुळे अनेक जण डिजीटल व्यवहारांना प्राधान्य देऊ लागले. अलीकडच्या काळात पारंपारिक उद्योगांपेक्षा नवनवीन कल्पना घेऊन बऱ्याच स्टार्ट-अप कंपन्यांचा उदय झाला, देशांतर्गत उद्योगवाढीसाठी शिथिल केले गेलेले नियम, परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी केले गेलेले प्रयत्न आणी याचा परिपाक म्हणून विकसित देशांत यशस्वी ठरलेल्या कल्पना घेऊन काही कंपन्यांनी देशभर त्यांचे जाळे निर्माण केले. पे-टीएम (Paytm) हा अशाच एका कंपनीचा ब्रँड म्हणून लोकप्रिय ठरत आहे.

कॅशलेस व्यवहारांसाठी व्यासपीठ आणी ई-कॉमर्स हा मुख्य व्यवसाय असलेल्या पे-टीएम सारख्या ब्रँडला नोटाबंदी नंतर उत्स्पुर्त प्रतिसाद मिळणे स्वाभाविक होतं, त्यात त्यांनी काही काळ बँक ट्रान्स्फर शुल्क माफ करणे, जास्तीत जास्त दुकानदार, लघुउद्योजक, सेवा पुरवठादार जोडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिनिधींची नेमणूक करणे अशा गोष्टी केल्यामुळे आज अनेक शहरांमध्ये पे-टीएमची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. नेट बँकिंग, यु.पी.आय तंत्रज्ञान याहून सोप्या पद्धतीचे कॅशलेस माध्यम म्हणून पेटीएम सारख्या सेवांकडे पहिले जात आहे. जणू एखाद्या एस.एम.एस प्रमाणे कमीत कमी वेळात पैसे स्वीकारणार्या चा फक्त मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी वापरून भारतात कुठूनही कुठेही पैसे पाठवणे पेटीएम, फ्रीचार्ज सारख्या सेवांमुळे शक्य आणी सोपे झाले. पे-टीएम मधून पैसे पाठवण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध झाल्यामुळे पे-टीएम द्वारे दुसऱ्याला पैसे पाठवण्यासाठी इंटरनेटची देखील आवश्यकता उरली नाही आणी या घडीला तरी पैसे पाठवण्यासाठी आणी स्वीकारण्यासाठी कोणते शुल्क आकारले जात नाही आणी म्हणूनच अशा सेवांच्या लोकप्रियतेमुळे येणाऱ्या काळात कॅशलेस व्यवहार वाढत जातील यात शंका नाही, आज पे-टीएम सारख्या दोन चार उपयुक्त सेवा उपलब्ध असल्या तरी पुढील काही वर्षांत कॅशलेस ह्या संकल्पनेचे स्वरूप बदलत जाणार आहे आणी त्याच्या फायद्यांबरोबरच त्याच्या आव्हानांसाठी देखील आपण तयार असणे गरजेचे आहे.

पैसा झाला खोटा..पूर्वीच्या काळात वस्तुविनिमय (Barter Trade System) करून वस्तू किंवा सेवा यांचे आदानप्रदान केले जायचे, धातूंचा शोध लागल्यावर सोने, चांदी सारखे मौल्यवान धातू विनिमयासाठी वापरले जाऊ लागले, त्यातूनच पुढे त्यांच्या मोहरा (Coins) आणी आज आपण वापरत असलेल्या नोटांपर्यंत आपण येऊन पोहोचलो. विनिमयाच्या ह्या टप्प्यापर्यंतच्या प्रवासात चलनाचे स्वरूप हे मूर्त अवस्थेत होते (हाताळता येण्याजोगे) परंतु आपण आता ज्या कॅशलेस व्यवस्थेच्या उंबरठ्यावर आहोत त्यापुढील प्रवासात १ आणी ० ह्या दोन आकड्यांच्या भोवती सगळी व्यवस्था फिरेल म्हणजेच तंत्रज्ञानामुळे पैशाला आभासी स्वरूप प्राप्त होईल. भ्रष्टाचार रोखण्यासाठी अशा व्यवस्था गरजेच्या असल्या तरी त्याचे वापरकर्ते म्हणून आपल्या जीवनशैलीवर त्याचे कसे आणी कोणते परिणाम होतात ह्याचा आपण विचार करायला हवा आणी म्हणूनच त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अगत्याचे ठरते.

पाश्च्यात्य देशांतील आर्थिक जीवनशैलीवर झालेल्या संशोधनांमधून असे लक्षात आले कि, लोक जेव्हा त्यांचे क्रेडीट किंवा डेबिट कार्ड वापरून खर्च करतात तेव्हा ती रक्कम रोख वापरून केल्या गेलेल्या खर्चापेक्षा १५% ते १८% अधिक असते. मॅकडॉनल्ड या एका आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या ब्रँडच्या अहवालानुसार, जेव्हा न्याहारीसाठी एका भेटीमध्ये लोक रोख देऊन खर्च करतात तेव्हा ती रक्कम सरासरी $४.५० डॉलर्स (म्हणजेच जवळपास ३०० रुपये) इतकी असते पण जेव्हा तीच लोकं खर्च करण्यासाठी क्रेडीट कार्डचा वापर करतात तेव्हा त्या वेळी खर्चाची रक्कम $७ डॉलर्स (४७० रुपये) पर्यंत जाते म्हणजेच कॅश एवजी कार्ड असल्यामुळे लोक $२ ते $२.५० जास्त खर्च करतात.
मध्यंतरी अॅपल या कंपनीकडून अनेक ग्राहकांना नुकसानभरपाई देण्यात आली कारण मुलांनी पालकांचे आयफोन वापरून अॅपलच्या अॅप स्टोर मधून मोठ्या प्रमाणावर अॅपलीकेशन्स विकत घेतली आणी त्या अमर्याद खरेदीची रक्कम अॅपलकडून बिलात जोडण्यात आली होती. रोख पैसे न देता केवळ एक दोन क्लिक करून गेम्स आणी अॅपलीकेशन्स फोनमध्ये घेता येत असल्यामुळे लहान मुलांकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर डिजीटल खरेदी झाली होती.

आणखी एक एक रंजक उदाहरण द्यायचे झाले तर Adam Carroll हे आर्थिक प्रगल्भता ह्या विषयातील संशोधक आणी वक्ते आहेत, त्यांनी एकदा त्यांच्या ३ मुलांना व्यापार डाव खेळताना पहिले आणी ती मुले ज्या पद्धतीने खेळत होती ते पाहून अॅडम चकित झाले कारण मुले नियमबाह्य पद्धतीने खेळत होती, ती मुले एकमेकांना खेळात टिकून राहण्यासाठी नियमांच्या विरोधात जाऊन आर्थिक आणी इतर प्रकारची देवाणघेवाण करत होती. काही काळ निरीक्षण केल्यावर अॅडम यांच्या असे लक्षात आले कि त्यातील विनिमयासाठी वापरला गेलेला पैसा खोटा असल्यामुळे कदाचित मुले अशा प्रकारे खेळत असावीत म्हणून अॅडम यांनी एक प्रयोग करायचे ठरवले आणी त्याच मुलांना $१०,००० डॉलर्सच्या (म्हणजे जवळपास पावणे सात लाख रुपये) खऱ्या नोटा त्या खेळात वापरायला दिल्या आणी जो खेळात जिंकेल त्याला शेवटी उरलेली रक्कम बक्षीस म्हणून देण्याचे कबुल केले.

खेळ सुरु झाल्यावर अॅडम यांची मुलगी जी नेहेमी नशीब हे धोरण ठेऊन खेळायची ती सर्वात आधी बाद झाली पण उरलेल्या दोन मुलांच्या आधीच्या खेळण्यामध्ये आणी आताच्या खेळण्यामध्ये धोरणात्मक बदल जाणवला. जो मुलगा आधी शक्य असलेली प्रत्येक गोष्ट विकत घ्यायचा तो खेळाच्या शेवटी विजेत्याला मिळणार असलेली रक्कम ध्यानात ठेऊन विचारपूर्वक निर्णय घेऊन काटकसरीने खेळला आणी त्याने अनावश्यक गोष्टींची खरेदी टाळली त्याचप्रमाणे दुसरा मुलगा जो मुलगा अधिकाधिक स्थावर मालमत्ता विकत घ्यायचा, त्याचा आता केवळ फायदेशीर मालमत्ता घेण्याकडे ओढा दिसला आणी शेवटी तोच खेळ जिंकला.

ह्या प्रयोगातून अॅडम यांनी असा निष्कर्ष काढला कि, आज मुले अशा काळात वाढत आहेत कि जिथे पैसा हा मूर्त स्वरुपात नाही. आज पैसा अधिकाधिक भ्रामक (आभासी) होत असला तरी त्याचे परिणाम हे वास्तववादी आहेत. Peter Drucker या व्यवस्थापन तज्ञाचा दाखला देत अॅडम म्हणतात, “आजच्या काळातील बँकिंग आणी आर्थिक क्षेत्रे ही अर्थकेंद्रित असण्यापेक्षाही जास्त माहिती केंद्रित आहेत आणी आजच्या पिढीतील मुलांना पैसे वापरण्याची माहिती किंवा अनुभव आयुष्यात लवकर मिळत नाहीत.”

साधारण दोन दशकांपूर्वी परदेशात केल्या गेलेल्या एका संशोधनामध्ये २०० कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणी त्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये काही समान गुणधर्म आढळले आणी त्यातील एक म्हणजे त्यांच्या कारकिर्दी मध्ये त्यांना लवकर नेतृत्व करण्याची संधी मिळाली म्हणजेच त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना असे महत्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यात आली कि ज्या निर्णयांचे परिणाम उलटसुलट होऊ शकले असते पण त्याच वेळी अशा निर्णयांच्या अनुभवातून मिळालेल्या धड्यांचे चिंतन आणी त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आले. ह्या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला कि ‘एखाद्या क्षमता असलेल्या व्यक्तीला, योग्य अशा अनुभवांना सामोरे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आणी त्याच बरोबरीने त्या अनुभवांमधून शिकण्यासाठी मदत केली तर त्या व्यक्तीच्या कारकीर्दीत त्याने एक उत्तम नेतृत्व म्हणून अधिक यश संपादन करण्याची शक्यता वाढते’.


अॅडम वरील दोन्ही प्रयोगांचा एकत्रित निष्कर्ष असा काढतात कि, ‘जर मुलांना त्यांच्या आयुष्यात अर्थ विषयक अनुभव घेण्याची संधी दिली आणी त्या अनुभवांतून मिळालेल्या धड्यांचे मार्गदर्शन केले तर पुढील कारकीर्दीत त्यांची आर्थिक उन्नती होण्याची शक्यता वाढते, आणी म्हणूनच मुलांना हे अनुभव आयुष्यात लवकर लवकर आणी मोठ्या प्रमाणात मिळायला हवेत’.

आज जागतिक पाळतीवर जी आर्थिक उलाढाल होते त्याच्या केवळ ४% देवाणघेवाण ही रोख स्वरुपात होते आणी बाकीची ९६% ही डिजीटल स्वरुपात होते. आजचा टेक्नॉलॉजी प्रिय तरुण हा रोख व्यवहारांना फारसे प्राधान्य देत नाही त्यामुळे आजचे चलन हे डिजिटल बनले आहे आणी भारतात जरी असे चित्र नसले तरी आपण हळूहळू त्याच दिशेने वाटचाल करत आहोत. भविष्यात डिजीटल वॉलेट, क्रिप्टो करन्सी, बायो-मॅट्रिक सारखे तंत्रज्ञान आर्थिक विनिमयाची मुख्य माध्यमे असणार आहेत आणी म्हणूनच सायबर सुरक्षिततेप्रमाणे आणी तितक्याच गंभीरपणे डिजीटल व्यवहारांचा कळत नकळत आपल्या जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

लहान मुलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, डिझ्नी या कंपनीने आपल्या अम्युझमेंट पार्क मध्ये वेगवेगळे खेळणे खेळण्यासाठी लोकांचा दर वेळी तिकीट काढण्यात वेळ जाऊ नये म्हणून घड्याळासारखा मनगटावर बांधता येणारा एक डिजीटल पट्टा तयार केला आहे, पार्क मध्ये प्रवेश करतानाच तो प्रत्येकाला देण्यात येतो. ज्याला जो खेळ खेळायचा आहे त्याने तिथे जायचे आणी आपल्या हातातला पट्टा त्या त्या खेळण्याच्या प्रवेश द्वारावर बसवलेल्या स्कॅनर समोर धरला कि त्यातून आपोआप तिकिटाच्या रकमे एवढे पैसे त्याचा बिलात जोडले जातात आणी तो खेळ खेळण्यासाठी प्रवेश मिळतो. एखाद्या लहान मुलाच्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया अमर्यादपणे करता येते आणी हवे तितके खेळ खेळता येतात अशीच आहे कारण ठराविक रोख रक्कम असल्यावर ती संपते आणी अजून खेळ खेळता येत नाहीत हा अनुभव अशा नव्या तंत्रज्ञानामुळे त्याला मिळत नाही.

पैसा झाला खोटा..


आजच्या घडीला अमेरिकेमध्ये एकूण कर्जाच्या प्रकारांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे कर्ज हे विद्यार्थ्यांच्या नावावर आहे. दर ५ पैकी १ विद्यार्थी कर्जाची परतफेड करण्यासाठी असमर्थ ठरत आहे. MoneyCharity ह्या संस्थेच्या संशोधनानुसार ब्रिटन मध्ये दर ५ मिनिट आणी ३ सेकंदाला एक व्यक्ती दिवाळखोर म्हणून जाहीर होते. अमेरिकेतील Demos या संस्थेच्या संशोधनानुसार वय वर्ष २४ ते ३४ या वयोगटातील व्यक्ती दिवाळखोर होण्याचा दर हा सर्वाधिक आहे. ह्या सगळ्याचे प्रमुख कारण म्हणजे ते खर्च करत असलेले पैसे मूर्त स्वरुपात नाहीत, ते केवळ आभासी आहेत पण त्यांचे परिणाम अतिशय वास्तववादी आहेत. भारतात आज जरी इतकी गंभीर परिस्थिती नसली तरी आपण त्याच मार्गाने पुढे जात आहोत म्हणूनच ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या उक्तीनुसार काळजी घेणे आवश्यक आहे.
अगदी वपुंचा संदर्भ जोडायचा झाला तर असे म्हणता येईल कि ‘खर्च होताना भान रहात नाही आणी मग हिशोब लावताना तारांबळ उडते’.

आर्थिक उलाढालीच्या तंत्रज्ञानाची अतिशय चांगली बाजू सुद्धा आहे पण ह्या तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा तितकाच तारतम्याने व्हायला हवा आणी म्हणूनच वापरकर्त्यांला या गोष्टीचे भान असले पाहिजे. अॅडम म्हणतात, मुलांना लहापणापासूनच आर्थिक नियोजनाची शिस्त लावायला हवी, त्यांना दर आठवड्याला किंवा महिन्याला ठराविक रोख पैसे खर्चासाठी देऊन काही जबाबदार्या पेलण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायला हवे (उदाहरणार्थ – अभ्यासाचे सामान, खाऊ, टीव्हीचे बिल इत्यादी इत्यादी), रोख पैसे हाताळताना ते कधीतरी संपतील या भावनेतून ते पैसे फक्त योग्य आणी आवश्यक त्या ठिकाणीच खर्च करावेत ही निर्णयक्षमता मुलांमध्ये वाढीस लागते. मुलांनी मोठेपणी मोठ्या पातळीवर आर्थिक नियोजनात संघर्ष करण्यापेक्षा लहानपणीच लहान पातळीवर आर्थिक नियोजन केले तर, जरी त्यांचे निर्णय फसले तरी ते पुढील आयुष्यात त्यांना उपयुक्त ठरतात कारण लहानपणी अशा निर्णयांतून मिळालेल्या धड्यांचे पालकांकडून योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते.

आगामी काळ हा डिजीटल असणार आहे आणी अर्थव्यवस्थादेखील बव्हंशी डिजीटल स्वरुपात कार्य करेल पण त्याचे परिणाम मात्र दृश्य स्वरुपात असतील म्हणजेच आपल्या जीवनशैलीवर त्याचे थेट परिणाम होतील आणी म्हणूनच जे डिजीटल वातावरण आपण तयार करत आहोत त्यातील तंत्रज्ञान पुढील पिढी आपसूक शिकेलही पण त्या वातावरणासाठी एक प्रगल्भ आर्थिक घटक म्हणून मुलांचा विकास करणे ही आपली जबाबदारी ठरते.

-    यशोधन वाळिंबे

This Is The Newest Post


EmoticonEmoticon